Wednesday, March 05, 2014

कोकण रेल्वे मार्गावर धावणार डबल डेकर

कोकण रेल्वे मार्गावर बहुचर्चित डबल डेकर ट्रेन काही कालावधीत धावण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या ट्रेनला भायखळा येथील बोगद्याचा अडथळा ठरण्याची शक्‍यता होती; पण सुरक्षा तपासणीत तो अडसर दूर झाला आहे. आता ही गाडी प्रत्यक्ष रेल्वे मार्गावर धावण्याला रेल्वे बोर्डाच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा आहे.

भारतीय रेल्वेमध्ये मुंबई ते बडोदा अशी डबल डेकर ट्रेन गेली काही वर्षे धावत आहे. या मार्गावर ही गाडी फारशी फायदेशीर ठरत नसल्याने ती मुंबई ते मडगाव अशी सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. सीएसटी ते मडगाव आणि मडगाव ते सीएसटी अशा पूर्णत: वातानुकूलित गाडीचा मार्ग निश्‍चित करण्यात आला; मात्र सुरक्षा चाचणीत ही गाडी कितपत यशस्वी होईल याबाबत साशंकता होती. त्याबाबत अनेक प्रश्‍नही निर्माण झाले होते. कोकण रेल्वे मार्गावर अनेक बोगदे असल्यामुळे त्या बोगद्यांतून ही डबल डेकर एसी एक्‍स्प्रेस जाऊ शकेल की नाही याबाबतही साशंकता होती. याखेरीज ठाण्याजवळील पारसिक आणि भायखळा येथील बोगद्यातून डबल डेकर सुटण्यात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्‍यता होती; परंतु याबाबतच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून सुरक्षाविषयक कोणतेच मुद्दे शिल्लक राहिले नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. आता तांत्रिक अडचणी सुटल्याने ही गाडी प्रत्यक्षात धावण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

देशात गोवा राज्यात पर्यटकांचा सर्वाधिक ओघ असतो. यात देशभरातील पर्यटक थेट मुंबईत येतात आणि तेथून गोव्यात उतरतात. या प्रवाशांसाठी डबल डेकर गाडी सोडण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने बोर्डाकडे ठेवला होता. त्यानुसार गेले दोन महिने या डबल डेकर एसी गाडीची चाचणी सीएसटी ते पनवेल अशी केली जात होती. या सर्व चाचण्यांत ही गाडी यशस्वी ठरल्याने कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर एसी ट्रेन धावण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
सीएसटी ऐवजी लोकमान्य टिळक मुंबईतील सीएसटी स्थानकावर वाहतुकीचा मोठा ताण आहे. दादर आणि ठाणे टर्मिनसवरही तशीच परिस्थिती असल्याने एसी डबल डेकर ट्रेन सीएसटी ऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव अशी सोडण्याचा विचार केला जात आहे.

via esakal.com

No comments:

Google
 

...